नांदेड : शाश्वत पर्यावरण, स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एसजीजीएस आयईटी), नांदेड येथे ‘संकल्प २.०’ अंतर्गत ‘Advances in Engineering and Science for Sustainable Environment and Energy (AESSEE-2026)’ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद दि. २३ व २४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात पार पडली. देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही परिषद ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाचा संगम ठरली.
रासायनिक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित या परिषदेत पर्यावरण संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता, कार्बन उत्सर्जन नियंत्रण, हरित प्रक्रिया तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. संशोधन आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी हे व्यासपीठ विशेष उपयुक्त ठरले.
परिषदेचे उद्घाटन दि. २३ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. व्ही. एस. सपकाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. जयांद्र अहिरे यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकारे होते. यावेळी परिषद संयोजक व विभागप्रमुख डॉ. प्रकाश जाधव, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अभिजित व्ही. नांदेडकर, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. ए. बी. गोंडे तसेच विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात डॉ. प्रकाश जाधव यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्याची गरज अधोरेखित केली. प्रमुख पाहुणे डॉ. सपकाळ यांनी शाश्वत विकास ही प्रत्येक अभियंत्याची जबाबदारी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे, असे आवाहन केले. डॉ. जयांद्र अहिरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील संधींचा वेध घेत तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी वापर करण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मनेश कोकारे यांनी संस्थेच्या संशोधन परंपरेचा गौरव करत अशा परिषदांमुळे विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारांना चालना मिळते, असे नमूद केले.
परिषदेच्या समारोप सत्रात पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी हरित रसायनशास्त्र, नवोन्मेष आणि उद्योग-अकादमिक सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित करत संशोधनाला शाश्वत विकासाशी जोडण्याचे मार्गदर्शन केले.
या परिषदेत उद्योगक्षेत्राचाही सक्रिय सहभाग दिसून आला. गोदावरी ड्रग्स लिमिटेड तसेच धनमुद्रा बँक, नांदेड आणि इतर विविध औद्योगिक संस्थांच्या सहकार्यामुळे परिषदेला अधिक व्यावहारिक व उद्योगाभिमुख दृष्टीकोन प्राप्त झाला. तांत्रिक कार्यशाळा, शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण, तज्ज्ञांची व्याख्याने आणि उद्योगाभिमुख स्पर्धांमुळे वातावरण अधिक ज्ञानसमृद्ध झाले. महाराष्ट्रासह देशभरातून एकूण ५६ सहभागी विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उत्कृष्ट शोधनिबंध आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. बी. देठे, डॉ. ए. डब्ल्यू. देशमुख, डॉ. संदीप मुंढे, डॉ. ए. पी. चव्हाण, प्रा. पी. ए. पवार, डॉ. डी. यू. गिराम आणि डॉ. पी. के. रामटेके यांसह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
‘संकल्प २.०’ ही परिषद शाश्वत पर्यावरण, स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला नवी दिशा देणारी आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करणारी ठरली. या यशस्वी आयोजनामुळे एसजीजीएस आयईटी, नांदेडच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


